फडणवीसांच्या महत्वकांक्षी हायपरला अजित पवारांचा रेड सिग्नल


पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगात कोठेही हायपर लूप हा प्रकल्प झालेला नाही. हा प्रकल्प आधी जगात होऊ दे. आपल्यावर पुणे-मुंबई या मार्गासाठी प्रयोग कशाला? हा प्रकल्प परवडणारा नसल्याचे वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला रेड सिग्नल दाखविला आहे. हायपर लूप तंत्रज्ञानाने पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे जोडल्यास अवघ्या १४ मिनिटांमध्ये प्रवास होऊ शकणारा हा स्वप्नवत प्रकल्प असून, तो रद्द करण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत.

सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आखला होता. त्यासाठी करारही करण्यात आला होता. पण उपमुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प गुंडाळण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. पवार म्हणाले, हायपर लूप प्रकल्प जगामध्ये कोठेही झालेला नाही. जगातअगोदर कुठे तरी हा प्रकल्प होऊ दे. तेथे यशस्वी झाल्यावर आपण या प्रकल्पाचा विचार करू शकतो. या प्रकल्पाची ट्रायल घेण्याचीही आपली आर्थिक क्षमता नाही. पुणे-मुंबई घाटमार्गातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बोगदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा बोगदा उपलब्ध झाल्यावर वाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे. त्यामुळे हायपर लूप प्रकल्पाबाबत विचार करावा लागणार असल्याचेही पवार म्हणाले.

Leave a Comment