अनु मलिकवरील लैंगिक गैरवर्तणुकीचा खटला पुराव्याअभावी बंद


#Metoo मोहिमे अंतर्गत प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले होते. पण त्यांच्यावरील हा खटला अतिरिक्त पुरावे न मिळाल्यामुळे बंद करण्यात आला आहे. अनु मलिक विरोधात खटला राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल करण्यात आला होता. पण हा खटला आता पुरावे न मिळाल्याने बंद करण्यात आल्यामुळे अनु मलिक यांना दिलासा मिळाला आहे.

या संदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अनु मलिक यांच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने खटला बंद करण्यात आला आहे. पुन्हा अनु मलिक यांच्या विरोधात एखाद्या महिलेने पुरावे सादर केले तर खटला पुन्हा सुरु करण्यात येईल, असे राष्ट्रीय महिला आयोग प्रमुख रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने दोन वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत #Metoo मोहिमेला सुरुवात केली होती. लैंगिक शोषणाचे नाना पाटेकरांसोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप झाले. तसेच अनु मलिकवरही आरोप करण्यात आले. अनु मलिक यांना या आरोपांमुळे रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल पर्व १० मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण इंडियन आयडॉल पर्व ११मध्ये पुन्हा त्यांची एण्ट्री झाली. त्यांच्या एण्ट्रीने सोशल मीडियावर खळबळ उडल्यामुळे नंतर अनु मलिकने स्वत: शोमधून काढता पाय घेतला. श्वेता पंडित आणि सोना मोहापात्रा यांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. परंतु या सर्व आरोपांचे अनु मलिक यांनी खंडन केले.

Leave a Comment