महाराष्ट्रातही करमुक्त होणार ‘तान्हाजी’


अजय देवगण अभिनीत तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील ‘तान्हाजी’ हा चित्रपट उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी करमुक्त केला आहे. पण ज्या वीरयोद्ध्याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. तो योद्धा महाराष्ट्राच्या मातीततला शिवरायांचा मावळा असतानाही हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला नव्हता. त्यापार्श्वभूमीवर सातत्याने तो करमुक्त करण्यात यावा अशी मागणीही करण्यात येत होती. राज्य सरकारच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला अनुसरुन ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबत घोषणा करतील, अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे ज्यांनी आपल्या प्राणाचे स्वराज्यासाठी बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर अशी मागणी इतर अनेक चित्रपट रसिकांनीही केल्यामुळे या मागण्यांचा विचार करता बुधवारी झालेल्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करीत आहे. या चित्रपटाने केवळ सहा दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या ओम राऊत यांनी केले आहे. तर अभिनेता अजय देवगणने यात तान्हाजी मालुसरे यांच्या प्रमुख व्यक्तीरेखेशिवाय या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. अभिनेत्री काजोलनेही या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी व्यक्तीरेखा साकारली आहे.

Leave a Comment