Whole वावर ईज Our म्हणणाऱ्यांसाठी महापालिकेने आणला चमत्कारी आरसा!


बंगळुरू : देशात विविध योजना स्वच्छ भारतच्या नावाखाली राबवल्या जात आहेत. पण असे असले तरी Whole वावर ईज Our म्हणणाऱ्यांची म्हणजेच उघड्यावर शौच करणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. दरम्यान आता देशातील एक महानगरपालिकेने या सगळ्या परिस्थितीला कंटाळून एक आगळावेगळा उपाय शोधला आहे. हा उपाय वाचून तुम्हाला देखील शॉक बसेल. त्याचबरोबर पण उघड्यावर शौच करण्याआधी लोक अनेकदा विचार करतील. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात उपाय म्हणून ग्रेटर बंगळुरू महानगरपालिकेने एक अनोखी कल्पना आखली आहे.

यासंदर्भातील वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील वेगवेगळ्या भिंतींवर पालिकेने आरसे बसवले आहेत, ज्यामुळे रस्त्यावर शौचास जाणाऱ्यांना लाज वाटेल. 8X4चा आरसा इंदिरानगरच्या ईएसआय रुग्णालयाच्या कंपाऊंडच्या एका भिंतीवर बसवण्यात आला आहे. हे आरसे शहरातील अशा ठिकाणी बसवण्यात आले आहेत त्या ठिकाणी सर्वात जास्त दुर्गंधी पसरलेली असते. अशा प्रकारचे आरसे शहरातील इतर ठिकाणी बसविण्याची महापालिकेची योजना आहे.


त्याचबरोबर एक क्यूआर कोडही या आरशांवर ठेवण्यात आला आहे ज्याचा उपयोग जवळच्या शौचालयाबद्दल जाणून घेण्यासाठी केला जाईल. या कल्पनेबाबत महानगरपालिकेचे आयुक्त बी.एच. अनिल कुमार यांनी, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना जाहीरपणे लाज वाटली पाहिजे. या उद्देशाने भिंतींवर काचा लगावण्यात आल्या आहेत.

तर, याबाबत दुसर्‍या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शहराची प्रतिमा उघड्यावर शौच करण्यासारख्या गोष्टींमुळे खराब होते. लोकांना या सर्व गोष्टींमुळे फुटपाथवर चालणे अवघड होते. लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, दंड लावण्याचा नियमही बनविला पण त्यात काही फरक पडला नाही. महानगरपालिकेच्या प्रत्येक काचेची किंमत सुमारे 2 लाख रुपये ऐवढी आहे.

Leave a Comment