कॅप्टन तानिया शेरगिल यांचा महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पहाच

काल देशाचा 72 वा सैन्य दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या परेडमध्ये पुरूषांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी केले. सध्या परेड दरम्यानचा तानिया शेरगिल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अंगावर देखील काटा आला.

तानिया शेरगिल तुकडीला आज्ञा देतानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी देखील रिट्विट केला. त्यांनी ट्विट केले की, यामुळे माझ्या अंगावर काटा आला. हे अविश्वसनीयरित्या प्रेरणादायी आहे. तानिया शेरगिल यांना मी खऱ्या अर्थाने सेलेब्रिटी मानतो. केवळ टीकटॉकचेच नाहीतर हा व्हिडीओ देखील ट्रेंडिंग व्हायला हवा.

सैन्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या परेडमध्ये पुरूष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन शेरगिल या पहिल्या महिला आहेत. त्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्येही सैन्याच्या तुकडीचे नेतृत्त्व करणार आहेत. मागील वर्षी कॅप्टन भावना कस्तुरी या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांचे नेतृत्त्व करणार्‍या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.

कॅप्टन शेरगिल यांनी मार्च 2017 मध्ये चेन्नईच्या ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले असून, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्यूनिकेशनमधून पदवी घेतली आहे. त्यांचे वडील, आजोबा आणि पंजोबा देखील सैन्यात कार्यरत होते.

Leave a Comment