सतेज पाटील कोल्हापूरचे तर विश्वजीत कदम भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री


मुंबई – दोन नव्या पालकमंत्र्यांची महाविकास आघाडीच्या सरकारकडून बुधवारी घोषणा करण्यात आली. त्यानुसार, सतेज पाटलांकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद तर विश्वजीत कदम यांच्यावर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पालकमंत्र्यांची यादी आठवड्याभरापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या यादीत शिवसेनेकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ तर काँग्रेसकडे ११ पालकमंत्रीपदे आली होती.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. पण, त्यांनी ते स्विकारण्यास नकार दिल्यामुळे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री असलेले काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. पण अखेर सतेज पाटलांनी यामध्ये बाजी मारली.

गेल्या महिन्यात सतेज पाटील यांनी पालकमंत्री होणार असल्याचे सूचक विधान केले होते. मुश्रीफ समर्थकांनी त्याला उत्तर देत आपला पालकमंत्री पदावर हक्क सांगितला होता. पण प्रत्यक्षात सुरुवातीला पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले तेव्हा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मुश्रीफ यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे तर सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने दोघांपासूनही कोल्हापूरचे पालकमंत्रिपद दूर राहिले होते.

Leave a Comment