केवळ संक्रांतीसाठीच नाही, तर संपूर्ण हिवाळ्यात करावे तिळाच्या लाडूंचे सेवन


मकरसंक्रांत आली, की घरोघरी गुळ पोळ्या आणि तिळगुळ बनविला जातो. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हणत आपण सर्वच एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करीत असतो. तिळगुळ, किंवा तिळाचे लाडू चवीला अतिशय चविष्ट तर असतातच, पण त्याशिवाय आरोग्यासाठी देखील अतिशय लाभकारी असतात. तिळामध्ये शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, लोह, ऑक्लेजिक अॅसिड, अमिनो अॅसिड्स, प्रथिने, आणि बी, सी, आणि ई जीवनसत्वे असतात. तर गुळामध्ये क्षार, लोह, सुक्रोज आणि ग्लुकोज ही तत्वे आहेत. त्यामुळे तीळ आणि गूळ हे दोन्ही आरोग्यवर्धक पदार्थ एकत्र केले जातात, तेव्हा शरीराला पोषण देणाऱ्या तत्वांनी युक्त असा तिळगुळ सर्वार्थाने आरोग्यवर्धक ठरतो.

तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण असल्याने, हिवाळ्यामध्ये सतत उद्भविणाऱ्या सर्दी पडशापासून शरीराला संरक्षण मिळते. यांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते. तसेच जर बद्ध्कोष्ठाची तक्रार असेल, तर तिळाच्या लाडवांचे सेवन करावे. ज्या व्यक्तींना तीळ आवडत नसतील त्यांनी केवळ गुळाचे सेवन केल्याने देखील बद्धकोष्ठ दूर होईल.

हिवाळ्याच्या मोसमामध्ये अस्थमा किंवा तत्सम श्वसनासंबंधी विकार असलेल्यांना सतत त्रास उद्भवू लागतो. कमी तापमान आणि त्याच्या जोडीला हवेतील प्रदूषण ह्या दोन्ही गोष्टी दम्याचा विकार असणाऱ्यांसाठी त्रासाच्या ठरतात. अश्या व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये तिळाच्या लाडवांचे सेवन आवर्जून करावे. या मुळे छातीमध्ये कफ साठत नाही, आणि जर जफ झाला असेल, तर तो बाहेर पडतो. कफ झाला असल्यास गरम दुधासोबत तिळाच्या लाडवांचे सेवन करावे.

तिळाच्या लाडवांचे सेवन दररोज केल्याने सांधेदुखी कमी होते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ लोह युक्त आहेत. तसेच दुधाच्या जोडीने तिळाच्या लाडवांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ते कॅल्शियम देखील मिळते. तसेच शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल, तरी त्यासाठी तिळाच्या लाडवांचे सेवन अतिशय लाभकारी ठरू शकते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून लहान सहान आजार दूर राहतात. मात्र तिळाच्या लाडवांचे सेवन हिवाळयापुरतेच मर्यादित ठेवावे. उन्हाळ्यामध्ये याच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता जास्त होऊन नाकातून रक्त येणे, त्वचा सतत लालसर दिसणे अश्या प्रकारच्या तक्रारी उद्भवू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment