दिल्लीत राहुल गांधींची आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट


नवी दिल्ली – आज (बुधवारी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच राहुल गांधींची भेट घेतली आहे, त्यांनी यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांची ही भेट घेतली.

आदित्य ठाकरे राहुल गांधीची भेट घेण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

आदित्य ठाकरे यापूर्वी दिल्लीला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण राहुल गांधी आणि त्यांची त्यावेळी भेट होऊ शकली नव्हती. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधीची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काल (मंगळवारी) दिल्लीतील फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या कार्यालयाला आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. समाज माध्यमे आणि संपर्क साधनांद्वारे सरकार खुप काही करू शकते, सरकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी तसेच शिक्षण आणि पर्यटन विकास करण्यासाठी समाज माध्यमांद्वारे काय करता येईल यावर आदित्य ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

Leave a Comment