शिवेंद्रराजेंची शिवछत्रपतींशी मोदींची तुलना करणाऱ्यांवर आगपाखड


मुंबई – आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने टीका करत आपण पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवर घालण्याची विनंती करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मराठी माणसांच्या भावना नरेंद्र मोदींना माहित असल्याने त्यांनी हे करायला सांगितले असेल, असे मला वाटत नसल्याचेही ते म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने आपली तुलना ते महाराजांसोबत करणार नाहीत. या प्रकरणाशी त्यांचा काडीमात्र संबंध नसेल अशी खात्री शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा नंतरच्या काळातील स्वातंत्र्य सेनानी यापैकी कोणाचीही तुलना कोणासोबत होऊ शकत नसल्याचेही शिवेंद्रराजे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी प्रतिमा असून ती त्यांनी स्वत: निर्माण केली आहे. जगासमोर नरेंद्र मोदी यांनी भारताची एक वेगळी प्रतिमा उभी करुन दाखवली आहे. त्यांनी देशवासियांचा विश्वास संपादीत केल्याची स्तुती देखील त्यांनी यावेळी केली.

पण काही अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षात असतात. असे काही प्रकार त्यांच्या माध्यमातून होतात आणि विरोधकांना पक्षनेतृत्त्वावर टीका करण्यास, चिखलफेक करण्यास संधी मिळते. अशा पदाधिकाऱ्यांना आवर घातला पाहिजे. योग्य ती समज त्यांना दिली पाहिजे अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन थांबवावे आणि प्रकाशन झाले असेल तर वितरण थांबवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment