कोणतेही तथ्य नसलेल्या काही वैद्यकीय मान्यता


आपण लहानाचे मोठे होत असताना अश्या अनेक गोष्टी आपण आपल्या अवतीभोवती पाहतो, ज्या आपल्यासमोर अगदी नेमाने घडत असतात. आपल्याला त्या गोष्टींची इतकी सवय होऊन जाते की आपण आपल्या नकळतच त्या गोष्टींचा स्वीकार करतो, आणि त्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडून जातात. पण या सवयी अवलंबण्यामागे कोणताही शास्त्रीय आधार आहे किंवा नही याचा विचार आपण फारच क्वचित करतो. हाच विचार आपल्या आरोग्याशी निगडीत सवयींच्या बाबतीतही लागू आहे. आपल्या आरोग्याशी निगडीत काही सवयी किंवा काही मान्यता अश्या आहेत, के ज्या आपण स्वीकारल्या खऱ्या, पण शास्त्रीय दृष्ट्या त्याला काही आधा राहे किंवा नही हे मात्र आपल्याला नीटसे ठाऊकच नाही.

आहारशास्त्राच्या नियमांप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने दिवसाकाठी आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवे. या मुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहून, पचनकार्य सुरळीत राहते, हे जरी खरे असले, तरी काही वैज्ञानिक मात्र ह्या गोष्टीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगतात. त्यांच्या मते, प्रत्यक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. ही गरज, त्या व्यक्तीची प्रकृती, व्यक्ती दिवसभरामध्ये करीत असलेल्या शारीरिक श्रमाचे प्रमाण, ती व्यक्ती रहात असलेल्या ठिकाणचे हवामान, इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते. प्रकृती चांगली राहण्यासाठी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे असले हे जरी आपल्याला माहित असले, तरी या आठ ग्लास पाण्यामध्ये आपण घेतो त्या अन्नपदार्थांमध्ये असलेले पाणीही समाविष्ट असते, याची पुष्कळ लोकांना कल्पनाच नसते. आपण दिवसभरामध्ये सेवन करीत असेलेल्या चहा, कॉफी, दूध. फळांचे किंवा भाज्यांचे रस, ताक, दही, व इतरही अन्नपदार्थांमध्ये पाण्याचा अंश असतोच, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. शारीरिक श्रम खूप करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातून पाणी घामावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा तहान लागल्याची भावना होऊन पाणी प्यायले जाते. तसेच उष्ण प्रदेशांमध्ये राहणाऱ्या व्यक्ती सतत तहानेची भावना होत असते. आपल्याला आवश्यक तितक्या पाण्याची गरज शरीर तहानेची सूचना देऊन पूर्ण करून घेत असते.

स्कीझोफ्रेनिया हा मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींची दुहेरी व्यक्तिमत्वे असतात, हा समज देखील चुकीचा आहे. हा समज काही चित्रपटांमध्ये दाखविलेल्या कथानकामुळे आणखीनच दृढ झालेला पहावयास मिळतो. पण स्कीझोफ्रेनिया हां अतिशय गंभीर मानसिक आजार असून, यामध्ये रुग्णाला सतत भास होत असतात, त्यामुळे रुग्णाला आपल्या अवतीभोवतीच्या जगाची जाणीवच रहात नाही. रुग्णाला जे भास होत असतात, त्याच्या अनुषंगानेच त्याचे वागणे बोलणे असल्याने रुग्णाचे दुहेरी व्यक्तिमत्व असल्याचा समज होतो. दुहेरी किंवा तिहेरी व्यक्तिमत्वे असणाऱ्या आजाराला डिसोसियेटिव्ह आयडेन्टीटी डीसॉर्डर असे म्हटले जाते. हा मानसिक आजार स्कीझोफ्रेनिया पेक्षा पूर्णतया वेगळा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment