स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?


भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. २०२० सालापर्यंत दर वर्षी ७६, ००० महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडतील असा अंदाज वैद्यकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. स्तनाचा कर्करोग हा मुख्यत्वे महिलांमध्ये आढळत असला, तरी पुरुषांमध्ये देखील स्तनाचा कर्करोग पाहिला गेला आहे. पण पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. महिलांमध्ये उद्भविणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण बत्तीस टक्के इतके असून, दर तीस महिलांमध्ये एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा आजार जरी गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास, व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. हा रोग बरा झाल्यानंतर महिला, इतर महिलांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आजाराचे वेळेत निदान झाल्यास औषधोपचार सोपे, कमी वेळेसाठी आणि कमी खर्चाचे होतात.

हा आजार कोणत्याही महिलेला होऊ शकतो. त्यामुळे वीस वर्षांवरील सर्व महिलांनी या आजाराशी संबंधित काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. वीस वर्षांवरील सर्व महिलांनी ‘ सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन ‘, म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. या मध्ये स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा स्तनातून कोणत्याही प्रकारचा स्राव होतो आहे का या कडे लक्ष देणे गरजेचे असते. मासिक पाळीनंतर सातव्या दिवशी ही तपासणी करावयाची असते. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशनच्या जोडीने वर्षातून एकदा ‘ मॅमोग्राम ‘ करून घेणे गरजेचे आहे. ज्या महिलांचा मासिक धर्म बंद झाला असेल, त्यांनी महिन्याच्या एका ठराविक तारखेला ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करणे आवश्यक आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्याच प्रमाणे स्तनातून कोणत्याही प्रकारचा स्राव होत असल्यासही त्याकडे दुर्लक्ष न करता, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे. स्तनावर अचानक अल्सर्स येऊ लागल्यास किंवा स्तनावरील त्वचेचा रंग अचानक बदलू लागल्यासही वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगामध्ये सतत थकवा जाणवणे, अचानक वजन भराभर कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. हे लक्षणे स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीतही जाणवतात. त्याशिवाय एक स्तन दुसऱ्यापेक्षा आकाराने लहान होणे, स्तनांमध्ये सतत दुखणे ही लक्षणे देखील उद्भविणाऱ्या आजाराची सूचक असू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment