थंडीच्या मोसमात आपल्या त्वचेची अशी घ्या काळजी


थंडीचा मोसम सुरु झाला की आपली त्वचा रुक्ष, कोरडी दिसू लागते. ती तशी दिसू नये या करिता थंडीचा मोसम सुरू होण्याच्या काही काळ आधीपासूनच आपण योग्य ती काळजी घेतली तर ऐन थंडीमध्ये त्वचेसंबंधी तक्रारी कमी उद्भवतील. जेव्हा बाहेरील हवामान थंड, कोरडे असते, तेव्हा त्वचेची आर्द्रता लवकर निघून जाते, त्यामुळे त्वचा रुक्ष, कोरडी दिसू लागते. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा जास्त आर्द्र राहू शकत नसल्याने हिवाळा सुरु होण्याआधीच योग्य ती उपाययोजना केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसांमध्ये काही व्यक्तींना अगदी कडकडीत पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. पण हा मोह टाळायला हवा. अगदी कडकडीत पाणी वापरण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. कडकडीत पाण्याने स्नान केल्याने त्वचा अजूनच कोरडी पडते. त्याशिवाय साबण वापरतानाही तो सौम्य, आपल्या त्वचेचा विचार करून निवडावयास हवा. तसेच आपण निवडलेला साबण थंडीच्या मोसमाच्या थोड्या आधीपासूनच वापरावयास सुरुवात करावी, म्हणजे आपल्या त्वचेला तो साबण अपायकारक तर नाही ना, हे पडताळून पाहणे सोपे होते.

थंडीच्या दिवसांमध्ये बदलत्या हवामानाप्रमाणे आपल्या आहारातही योग्य ते बदल करावयास हवेत. ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असलेल्या खाद्यपर्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. तसेच इ जीवनसत्व असणारे अन्नपदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत. या आहारामुळे आपल्या त्वचेला आर्द्रता प्राप्त होईल, व त्वचेचे आरोग्य चांगले राहील. नाश्त्याच्या वेळी आपल्या आहारामध्ये थोडे काजू व बदामासारख्या सुक्या मेव्याचा समावेश अवश्य करायला हवा. तसेच योग्य प्रमाणात लोणी, तूप व तेलाचाही आपल्या आहारात समावेश असावा.

थंडी पडायला लागली की आपल्याला घाम येणे बंद होते. शरीरातील पाणी घामावाटे बाहेर टाकले जात नसल्याने आपल्याला तहानेची भावनाही कमी होते. त्यामुळे आपोआपच पाणी पिण्याचे प्रमाण घटते. पण असे होऊ न देता दिवसाकाठी आठ ग्लास पाणी पिणे इष्ट आहे. यामुळे त्वचा कोरडी न पडता, त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्वचा कोरडी पडू नये यासाठी एखाद्या उत्तम प्रतीच्या मॉईश्चरायझर चा वापर करावा. आपली त्वचा जर फारच कोरडी असेल, तर लॅक्टिक अॅसिड असलेल्या क्रीम किंवा लोशनचा वापर करावा. त्वचेवरील मृत पेशी हटविणे हेही गरजेचे असते, त्यासाठी स्क्रबचा वापर न करता, पपई व अननस वापरून बनविलेला फेस मास्क वापरावा. स्क्रब ने त्वचा घासल्यास त्वचा अजूनच कोरडी पडू शकते.

आपण थंडीच्या दिवसांमध्ये देखील अनेकदा चेहरा पाण्याने धुवत असतो. त्यावेळी चेहरा धुण्याकरिता एखाद्या सौम्य फेस वॉशचा वापर करावा. ज्यांची त्वचा खूपच कोरडी असते, त्यांनी त्वचा मुलायम ठेवण्यासाठी गुलाबजलाचा वापर करावा. गुलाबजल वापरताना, ते त्वचेवर लाऊन घेऊन त्यावर लगेचच एखादे उत्तम प्रतीचे मॉईश्चरायझर लावावे. असे केल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहून त्वचा मुलायम राहते. थंडीच्या काळामध्ये चेहरा पुसण्याकरीता वेट वाइप्सचा वापर करणे टाळावे. त्वचा मुलायम होण्याकरिता खोबरेल तेलाचा वापर हा सर्वतोपरी सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment