साखर कर्करोगाला चालना देते


कर्करोग बरा करणारे कसलेही औषध तयार झालेले नाही. तूर्तास तरी एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला तर तो प्राथमिक अवस्थेत फार तर शस्त्रक्रिया करून बरा करता येतो पण तो दुसर्‍या स्टेजला असेल तर तो दुरुस्त होत नाही. फार तर रुग्णाचे आयुष्य काही वर्षांनी वाढवता येते. त्याचीही शाश्‍वती नाही. म्हणजे कर्करोग हा शास्त्रज्ञांसाठी अज्ञात प्रदेश आहे. तो दुरुस्त होत नाही कारण तो होतो कसा याचाच अद्याप शोध लागलेला नाही. गेली अनेक वर्षे त्याचा शोध घेतला जात आहे. गेल्या ९ वर्षांपासून शास्त्रज्ञांनी कर्करोगाला साखरेमुळे काही चालना मिळते का यावर संशोधन सुरू ठेवले होते. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.

साखरेमुळे कर्करोग होणार्‍या पेशींना चालना मिळते असा निष्कर्ष या संशोधनातून निघाला आहे. म्हणजेच कर्करोगा विषयीच्या अज्ञात प्रदेशाचा दरवाजा काही प्रमाणात किलकिला झाला असून हे संशोधन म्हणजे मोठाच साक्षात्कार असल्याचे तज्ज्ञांमध्ये मानले जात आहे. हे संशोधन बेल्जीयम मध्ये झालेले आहे. या संशोधनात साखर आणि कर्करोग यांचे थेट नाते काय आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्या देशात नेहमीच साखरेबाबत दोन मते मांडली जातात. विशेषत: स्वदेशीवर जादाच भरवसा असणारे काही प्रचारक साखर ही परदेशातली वस्तू असल्याचे आणि ती वर्ज्य करणे आवश्यक असल्याचे सांगत असतात. या संबंधातली एक पोस्ट सध्या व्हॉटस ऍप वर व्हायरल झाली असून तिच्यात साखर किती घातक असते याची तपशीलवार माहिती दिलेली आहे.

ही पोस्ट टाकणारांनी साखरेवर अनेक दोष लावले आहेत. साखर ही परदेशातून १९६८ साली भारतात आली, तिच्यापूर्वी भारतात गोडीसाठी गूळच वापरला जात होता असे ही पोस्ट सांगते. एकंदरीत गूळ हा आपला आणि साखर ही दुसर्‍यांची असे त्यांनी मानलेले आहे. साखर तयार करताना गंधकाचा वापर होतो. हे गंधक शरीरात गेले की बाहेर पडत नाही. साखर ही शरीरातली चरबी वाढवते. तिच्याने वजन वाढते आणि वाढलेल्या वजनाचा माणूस कधी ना कधी हृदय विकाराला बळी पडतो. साखरेमुुळे रक्तदाबही वाढतो. एकंदरीत साखरेचे हे सारे दोष शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेले आहेत का आणि झाले असल्यास कोठे याचे उत्तर ही पोस्ट देत नाही. डॉक्टर मात्र साखरेत अनेक दोष असल्याचे मान्य करतात पण दोषांच्या बाबतीत गूळ हा काही साखरे इतकाच दोषी आहे असे डॉक्टरांचे मत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment