‘परी’ संस्थेची मागणी; निर्भयाच्या दोषींच्या फाशीचे थेट प्रेक्षपण करा


नवी दिल्ली : सामाजिक संस्था ‘परी’ (पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया)ने निर्भया बलात्कार प्रकरणात माहिती प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले असून निर्भयाच्या चारही दोषींची फाशी थेट प्रेक्षपण करण्याची मागणी ज्यामध्ये करण्यात आली आहे. पत्रामध्ये असे लिहिण्यात आले आहे की, देश आणि विदेशातील प्रसार माध्यमांना परवानगी देण्यात यावी की, त्यांनी तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींना फाशीचे थेट प्रेक्षपण करावे.

22 जानेवारी 2020 ला निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याच्या निर्णयाचा मी आदर करते. तुम्हाला मी विनंती करते की, निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे. यासाठी तुम्ही सर्व नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रसार माध्यमांना परवानगी द्यावी. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत हा निर्णय मोठा बदल ठरू शकतो, अशी मागणी संस्थेच्या संस्थापक आणि सोशल अॅक्टिव्हीस्ट योगिता भयाना यांनी केली आहे. तसेच परि संस्थेच्या मागणीला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी पाठिंबा दिला आहे.

फाशीच्या शिक्षेचे थेट प्रेक्षपण करावे यावर बोलताना वकील आसिम सरोदे म्हणाले की, फाशीच्या शिक्षेचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे ही मागणी बालिश असण्यासोबतच बेकायदेशीर आहे. ही मागणी माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली असल्यामुळे मंत्रालयाने त्यांना त्वरित समजावून सांगणे गरजेचे आहे. शिक्षा हा प्रदर्शन करण्याचा मुद्दा नसल्यामुळे शिक्षेचे थेट प्रेक्षपण करणे हे समाजातील बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षणे आहे.

फाशीच्या शिक्षेचे थेट प्रेक्षपण करण्याची मागणी योग्य नाही. अशी मागणी करणाऱ्यांनी आधी अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांकडे लक्ष द्यावे, त्यासंदर्भातल्या मागण्या कराव्यात. बलात्कार रोखण्यासाठी बेसिक सुधारणा गरजेच्या आहेत. मानसिकता बदलणे गरजेचे आहे. चीनमध्ये वैगरे चौकात फाशी दिली जाते. पण त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले नाही. बलात्काराचे मूळ हे मनुस्मृतीमध्ये आहे. हैदराबाद घटनेच्या एन्काऊंटर नंतरही बलात्काराच्या घटना थांबल्या का? यावरुन आपण धडा घेतला पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment