सर्वोच्च न्यायालयाची सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीला स्थगिती


नवी दिल्ली – राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. पण सायरस मिस्त्री यांनी आधीच आपण टाटा सन्सचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लवादाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची फेरनियुक्ती करण्याचा लवादाचा आदेश कायद्याच्या कक्षेत न बसणारा आणि कंपनी कायद्याला धरून नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी चार आठवड्यांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. लवादाने १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाला टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवून त्याजागी एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपल्याला हटविल्यानंतर या प्रकरणी सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे तक्रार दाखल केली होती. त्याच खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता.

टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने दिलेला निर्णय गोंधळ निर्माण करणारा आहे. देशातील महत्त्वाच्या कॉर्पोरेट कंपन्यांचे काम कशा पद्धतीने चालायला हवे, यामुळे गोंधळ निर्माण होतो आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.

Leave a Comment