एखादे रेल्वे स्टेशन निव्वळ अफवेमुळे तब्बल 42 वर्ष बंद होते, हे वाचूनच विश्वास बसत नाही ना? मात्र हे खरे आहे. पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन 42 वर्ष बंद होते.
हे रेल्वे स्टेशन 1960 मध्ये सुरू झाले होते. हे रेल्वे स्टेशन सुरू करण्यामध्ये संथालची राणी श्रीमती लाचन कुमारी यांचे मोठे योगदान होते. येथे काही वर्षानंतर विचित्र घटना घडू लागल्या. 1967 मध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने येथे एका महिलेचे भूत बघितल्याचा दावा केला. सोबतच अफवा पसरली की, तिचा मृत्यू त्याच रेल्वे स्टेशनवर अपघातात झाला होता. रेल्वे कर्मचाऱ्याने ही माहिती सर्वांना सांगितली, मात्र कोणीच विश्वास ठेवला नाही.

त्यानंतर रेल्वे क्वॉर्टरमध्ये बेगुनकोडोरचे स्टेशन मास्तर आणि त्यांचे कुटूंब मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. याच्या मागे भूताचा हात असल्याची अफवा पसरली. येथील लोकांनी दावा केली की, सायंकाळी रेल्वे जाते त्यावेळी महिला भूत देखील धावते आणि कधीकधी तर रेल्वेच्या देखील पुढे निघून जाते.

या घटनानंतर हे भूतांचे रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाऊ लागले. या भूताची एवढी भिती निर्माण झाली की लोक स्टेशनवर यायला घाबरू लागले. हळूहळू लोक येणेच बंद झाले व स्टेशन सुनसान झाले.

येथे पोस्टिंग झालेले रेल्वे कर्मचारी देखील येण्यास मनाई करतात. एवढेच नाहीतर रेल्वे देखील येथे थांबत नाही. कारण कोणताच प्रवासी भितीने येथे उतरत नाही.

मात्र 42 वर्षानंतर 2009 मध्ये गाववाल्यांच्या सांगण्यावरून तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन सुरू केले. त्यानंतर या स्टेशनवर भूत पाहिल्याचा दावा करण्यात आलेला नाही. मात्र आजही सुर्य मावळल्यावर रेल्वे येथे थांबत नाही. येथे जवळपास 10 रेल्वे थांबतात. हे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी देखील पर्यटक येतात.