धर्माच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मोदी


नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असून धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ मोदी राबवत असल्याचा आरोप तरुण गोगोई यांनी केला आहे.

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा गोगोई यांनी निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान आरोप करतात की काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतो. पण त्यांनी आपला स्तर शेजारी राष्ट्रांपेक्षाही खाली आणला आहे. जिना यांच्या दोन देश सिद्धांताच्या दिशेने नरेंद्र मोदी वाटचाल करत असून भारताचे हिंदू जिना म्हणून उदयाला येत आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरुन ज्याप्रकारे देशभरात आंदोलन सुरु आहे, त्यावरुन भाजप आणि त्यांच्या संघटनांची हिंदुत्त्व विचारसरणी लोकांनी नाकारली असल्याचे सिद्ध होत आहे. आम्ही हिंदू आहोत पण आपला देश हिंदू राष्ट्र होताना पाहण्याची इच्छा नाही. विरोध करणाऱ्यांमध्ये जास्त संख्या हिंदूंची आहे. जे भाजप आणि आरएसएसच्या हिंदुत्त्वाविरोधात आहेत.

Leave a Comment