शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी बसवण्याचा संजय राऊतांनी बांधला चंग


मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. पण संजय राऊत आता आता एका नव्या कामाला लागले आहेत. शरद पवार यांना २०२२ मध्ये राष्ट्रपती पदावर बसवण्याचे त्यांचे लक्ष्य असून त्यांनी यासाठी चंग बांधला आहे.

राष्ट्रपतीपदाचे बिगरभाजप दलाचे उमेदवार अर्थात शरद पवार असावेत, अशी संजय राऊत यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. राष्ट्रपतीपद शरद पवार यांनी भूषवावे यासाठी संजय राऊत त्यांची सहमती मिळवण्यासाठी मनधरणी करणार असून त्याचबरोबर राऊत हे बिगरभाजप दलाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांचे पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक २०२० मध्ये होणार आहे, आपल्याकडे त्यावेळी पुरसे संख्याबळ असेल असा विश्वास संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत असले तरी त्यांच्याकडे राज्यसभेत बहुमत नाही. देशातील राजकीय स्थिती सध्या बदलत असून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बिगरभाजप असलेली राज्य महत्वाची भूमिका बजावतील. त्यातच राष्ट्रपतीपदाचे शरद पवार हे उमेदवार असतील, तर निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळून येऊ शकते, असे मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment