भारतातील मुस्लिमांची काळजी तुम्ही करू नका, ओवेसी यांचा इम्रान खानला टोला


नवी दिल्ली – एक कथित व्हिडिओ शेअर करत भारतावर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी टीका केली होती. एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. भारतातील मुस्लिमांची काळजी इम्रान खान यांनी करू नये. आपला देश त्यांनी सांभाळावा आणि तेथील शिखांची काळजी घ्यावी, असे ओवेसी म्हणाले.

भारतातील मुस्लिमांची काळजी इम्रान खान यांनी करू नये. आपला देश त्यांनी सांभाळावा. आमचे संविधान हेच आमच्यासाठी देव असून तुमच्या देशाची तुम्ही काळजी करा. जो हल्ला शिखांवर झाला त्याकडे लक्ष द्या. हे लक्षात ठेवा की, आम्ही मोहम्मद अली जीना यांचा सिद्धांत नाकारला आहे. आम्हाला भारतीय असल्याचा गर्व आहे, असे ओवेसी म्हणाले.

एक कथित व्हिडिओ शेअर करत इम्रान खान यांनी भारतावर टीका केली होती. भारतात नागरिकत्व सुधारणा आंदोलनावरून चालू असलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ म्हणून त्यांनी बांगलादेशातील व्हिडिओ शेअर केला. मुस्लिमांवर उत्तरप्रदेश पोलीस हल्ला करत आहेत. मोदींची मुस्लिमांना नष्ट करण्याची जी योजना आहे, तिचाच हा भाग असल्याचे शीर्षक त्यांनी या व्हिडिओला दिले. पण इम्रान खान त्यांचा हा दावा फोल ठरला. हे व्हिडिओ बांगलादेशामधील असल्याचे समोर आले आहे. ‘फेक व्हिडिओ’ असल्याचे समजताच इम्रान खान यांनी ट्विटरवरून व्हिडिओ काढून टाकला होता.

Leave a Comment