बोगस डिग्री प्रकरणी माझी आणि विनोद तावडेंची चौकशी करा – उदय सामंत


रत्नागिरी – पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी महाविकास आघाडी सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी घेतलेले विद्यापीठ आणि ही पदवी बोगस असल्याचा आरोप केला आहे. तर हे सर्व आरोप सामंत यांनी खोडून काढले आहेत.

माझ्यावर आता जो आरोप झाला आहे, विनोद तावडे मंत्री असतानाही तोच आरोप झाला असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीच माझी अन् विनोद तावडे यांची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी एक सदस्यीय समिती प्रवीण दरेकर यांची नेमावी. जी काही चौकशी करायची आहे ती दरेकरांनी करावी, दरेकर साहेब पूर्ण पारदर्शक असल्यामुळे चांगल्या पद्धतीने आमची चौकशी करतील आणि आम्हाला न्याय देतील असा, टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे.

ज्ञानेश्वर विद्यापीठात मी शिकलो, यात मला कमीपणा वाटत नसल्याचे स्पष्ट मत सामंत यांनी मांडले आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? आणि काय उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले आहेत, याची चौकशी करावी, अशी सूचना मी सरकारला करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. डॉ. मनोहर आपटे यांनी हे विद्यापीठ ज्यांना शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, जे डोनेशन भरू शकत नाहीत, अशा होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असल्यामुळे आपण तिथे शिकलो. पण, तेव्हा मला माहित नव्हते, मी आमदार होईन, मंत्री होईन आणि या विद्यापीठातून मी घेतलेली पदवी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. पण, या पदवीपासून आपण कोणतेही शासकीय लाभ घेतले नसल्याचेही सामंत यांनी सांगितले.

Leave a Comment