विमानाला उड्डाण घेण्यास उशीर झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी क्रु मेंबर्सला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीवरून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही घटना घडली.
दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर बिघाडामुळे विमानाने उड्डाण घेतले नाही. उड्डाणाला उशीर झाल्याने संतप्त प्रवाशांनी क्रु मेंबर्सला मारहाण केली व कॉकपिटचा दरवाजा तोडण्याची देखील धमकी दिली व गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Look at what they are doing with cabin crew. In US they would have been arrested. @MoCA_GoI @DGCAIndia #shameful pic.twitter.com/ASi1CVyL3k
— Tarun Shukla (@shukla_tarun) January 4, 2020
दिल्लीवरून मुंबईच्या दिशेने विमान 10 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण घेणार होते. विमानात प्रवाशांना 9.15 मिनिटांनी बोर्ड करण्यात आले होते. मात्र तांत्रिकी बिघाडामुळे वेळेवर विमानाने उड्डाण घेतले नाही व विमानाला रनवे वरून बाजूला काढण्यात आले. उड्डाणास उशीर झाल्याने प्रवाशांनी पायलटला कॉकपिटमधून बाहेर येऊन स्थिती स्पष्ट करण्यास सांगितले.
बिघाड दुरुस्त न झाल्याने प्रवाशांना 2.20 वाजता विमानातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना 6 वाजता दुसऱ्या विमानातून मुंबईला पाठवण्यात आले. प्रवाशांना मुंबईला पोहचायला 8 तास उशीर झाला.
एअर इंडियाने या घटनेचा अहवाल मागितला असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.