…तर मग ‘करून दाखवले’ असे होर्डिंग कशाला लावले


सांगली – ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची जी कर्जमाफी केली आहे त्यावरुन सरकारवर अनेकजण टीका करत आहेत. त्यातच शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणारच नसेल तर, करून दाखवले, असे होर्डिंग कशाला लावले, असे म्हटले आहे. काल सांगली शहरात राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा पार पडला. शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंदमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी सहभागी होऊन सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले आहे.

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर मेळाव्यात जोरदार टीका केली. खऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नसून शेती ज्यांनी सोडली आहे, अशा कर्जधारकांना होणार असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर, गावोगावी होर्डिंग लावण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राजू शेट्टी म्हणाले, खरीप हंगामातील सर्व पिके गेल्या वर्षी वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि महापूर यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपासून एकही शेतकरी वाचू शकला नाही. ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्ये कर्ज घेतले ते शेतकरी जून 2020ला थकबाकीदार होणार आहेत. या शेतकऱ्यांना सरकारला दिलासा द्यायचा असेल तर, शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ केले जावे.

Leave a Comment