झोप का उडालीय ?


तरुण पिढीचे काही दोष सध्या जाणवायला लागले आहेत. मोबाईलचा अतीवापर आणि त्याचा दृष्टीवर झालेला परिणाम ही समस्या तर या पिढंीला जाणवतच आहे पण स्पर्धेच्या युगाचा अतिरेक आणि करीयर करण्याच्या भ्रामक कल्पना यांचाही दबाव या पिढीवर आहे. म्हणूनच या पिढीला आता निद्रानाशाचाही त्रास होऊ लागला आहे. एक इंग्रजी दैनिकाने काही मानसोपचार तज्झांच्या मदतीने देशातल्या प्रमुख शहरांत तरुण पिढीचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे दिसून आले की, या पिढीवर परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेचा तणाव, करीयरची अनिश्‍चितता आणि यशस्वी होण्याबाबतची साशंकता यांनी ग्रासले आहे.

पाहणी केलेल्या तरुणांपैकी ६४ टक्के तरुणांनी आपल्या निद्रानाशाचे कारण परीक्षेचा तणाव हे असल्याचे नमूद केले आहे. तर ४१ टक्के तरुण तरुणींनी आपले दिसणे चांगले आहे की नाही याची चिंता सतावत असल्याचे सांगितले. यात कॉलेजला जाणार्‍या मुला मुलींचा मोठा समावेश आहे. आपण शाळांत जातो तेव्हा आपले वेश आणि केशरचना यांना काही महत्त्व नसते कारण सर्वांना एकच गणवेष घालावा लागतो पण एकदा शाळा संपून महाविद्यालयात जायला लागलो की मात्र आपले कपडे आणि आपले दिसणे याला महत्त्व येते. आपला प्रभाव पडतोय की नाही याची चिंता लागून रहाते. मात्र आपले शिक्षण पूर्ण होऊन आपले करीयर चांगले होऊन यशस्वी ठरू की नाही याचीही काळजी वाटायला लागते असे ७० टक्क्यांपेक्षाही अधिक मुला मुलींनी सांगितले.

आपले कुटुंब, आपले नातेसंबंध आणि त्यातील तणाव हाही अनेकांचा चिंतेचा विषय आहे. खरे तर आपण यशस्वी झाले पाहिजे असे वाटते तेच मुळी कुटुंबामुळे. आपण यशस्वी होणे हे जसे आपल्यासाठी आवश्यक असते तसेच ते आपल्या आईवडिलांना आनंद वाटावा यासाठीही असते. तेव्हा आपल्या माता पित्यांना समाधान वाटावे असे आपले करीयर होईल की नाही याची चिंता वाटायला लागते. आपण यशस्वी झालो नाही तर आपल्या कुटुंबात आणि आपल्या नातेवाईकांत आपली नाचक्की होईल असे वाटायला लागते. कोची, जयपूर, भुवनेश्‍वर या शहरांत ७० टक्के तरुणांनी आपले करीयर हे नातेवाईकांत आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठीच असल्याचे म्हटले. तेव्हा नातेसंबंध हेही काळजी, तणाव आणि परिणामी झोप उडणे यामागचे कारण आहे. शिवाय वैवाहिक जीवनाचीही चिंता या मुला मुलींनी लागलेली असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment