माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत तोडणार शिवबंधन ?


मुंबई – तीन पक्ष मिळून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. पण, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसमोरील संकटात यामुळे दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रतिक्षेनंतर झाला असला तरी, तिन्ही पक्षातील अस्वस्थ नेत्यांमध्ये तेव्हापासून मोठी भर पडली आहे. त्यातच शिवसेनेत नाराजाची मोठी संख्या आहे. पक्षावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि युती सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिलेले डॉ. दीपक सावंत हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत ते असल्याचे सांगितले जात आहे. पक्षात कोणतीही जबाबदारी आपल्याला दिली जात नाही. मी केवळ शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून बांधलेले शिवबंधन ठेवायचे की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेऊ, असे सावंत यांनी म्हटल्याचे माध्यमांत आले आहे.

सावंत हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. सावंत यांना गेल्या वर्षी विधान परिषदेची उमेदवारी दिली नव्हती. त्यांनी त्यावेळीही आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचे मंत्रिपदही काढून घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांची खदखदही वाढली होती. पण, त्यांनी शांत राहणेच त्यावेळी पसंत केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांची संख्या वाढली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते माजी मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक वाद झाल्याचेही सांगण्यात येते. त्याचबरोबर मंत्रिमंडळात शिवेसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम यांना स्थान न मिळाल्यामुळे तेही पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त विविध माध्यमांत आले होते. आता राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अब्दुल सत्तार यांनीही कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेसमोरील संकटात वाढ होताना दिसत आहे.

Leave a Comment