गद्दार सत्तारांना मातोश्रीची पायरीही चढू देऊ नकाः चंद्रकांत खैरे


औरंगाबाद – अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचे नाट्य संपले असे वाटत असतानाच त्यांच्यावर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जहरी टीका केली आहे. शिवसेनेशी अब्दुल सत्तार यांनी गद्दारी केली आहे. मातोश्रीची पायरीही त्यांना चढू देऊ नये, अशा संतापलेल्या स्वरात खैरे यांनी टीका केली.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मीना शेळके या औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदी विजयी झाल्या. पण उपाध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊन तिथे भाजपचे एल जी गायकवाड यांचा विजय झाला. सत्तार यांच्या गटाच्या सहा सदस्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे खैरे हे प्रचंड चिडले होते.

ते म्हणाले, कदापि सत्तारांची गद्दारी सहन करणार नाही. सत्तारच शिवसेनेच्या पराभवाला जबाबदार आहेत. मी ज्यावेळी सत्तारांची भेट घेतली. त्यावेळी मोठमोठ्या स्वरात ते शिवसेनेवरच ओरडत होते. उद्धव ठाकरेंसमोर राजीनामा फेकून दिल्याचे ते सांगत होते. चंद्रकांत खैरे हे ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

मंत्रिपदावर राहण्याचा अशा व्यक्तीला अधिकार नाही. सिल्लोडला शिवसेना नसल्याचे ते म्हणतात. शिवसेना आम्ही कष्टाने उभी केली आहे. हे आयते टिकोजी येऊन आम्हाला सांगत आहेत. त्यांनी राजीनामा देऊन, पुन्हा निवडणूक लढवावी. शिवसेनेमुळेच ते निवडून आले आहेत. आपण याबाबत उद्धव ठाकरेंना बोलणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment