नाराज अब्दुल सत्तारांनी दिला राज्यमंत्रिपदाचा राजीनामा


मुंबई – विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीसाठी त्यांचा राजीनामा मोठा धक्का मानला जात आहे.

कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द आपल्याला देण्यात आल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. तसेच ते कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अब्दुल सत्तार हे निकटवर्तीय मानले जातात. तसेच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपच्या जवळ असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

आपल्या आमदारकीचा अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यार असल्याची आशा त्यांना होती. शिवसेनेने त्यांना राज्यमंत्रिपद दिले. तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे सत्तार नाराज होते. परंतु खातेवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Leave a Comment