कोट्यवधी मोजा आणि मेट्रो स्टेशनला स्वतःचे नाव द्या


देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मेट्रो ३ कोरीडोर स्टेशनसाठी स्वतःचे नाव देण्याची संधी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने उपलब्ध केली असून एखादी व्यक्ती स्वतःचे किंवा एखादी संस्था यांचे नाव स्टेशनला देऊ शकणार आहेत. अर्थात त्यासाठी भारी भक्कम रक्कम मोजावी लागणार असून हे नाव संबंधित स्टेशन सोबत एक वर्षासाठी देता येणार आहे.

मेट्रो स्टेशनना खासगी मालमत्तेशी जोडल्यानंतर मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने स्टेशनची नावेही खासगी संस्थांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुलाबा ते बांद्रा या दरम्यान ३३ किमीचा मार्ग मेट्रो कोरीडोर ३ या योजनेखाली उभारला जात असून त्यात २७ स्टेशन्स आहेत. २०२१ पूर्वी या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. प्रत्यक्षात मेट्रो सुरु होण्यापूर्वी अन्य कमाईचे मार्ग मेट्रो अजमावून पाहत आहे. स्टेशनला खासगी नावे देणे हा त्याचाच एक भाग आहे. कुलाबा ते बांद्रा हा मेट्रो मार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा भूमिगत मार्ग आहे.

या मार्गाच्या जवळ अनेक व्यावसायिक संस्था, हॉस्पिटल, कॉलेजेस आणि प्रसिद्ध हौसिंग सोसायट्या आहेत. त्यातील महत्वाच्या स्टेशनला तुम्ही स्वतःचे नाव देऊ इच्छित असला तर त्यासाठी वर्षाच्या कालावधीसाठी १ ते ५ कोटी रुपये आणि सीएसटी, बीकेसी, एअरपोर्ट स्टेशनसाठी ५ ते १० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment