रिंकू राजगुरुच्या आगामी ‘मेकअप’चा ट्रेलर रिलीज


‘सैराट’ चित्रपटात बिनधास्त भूमिका साकारल्यानंतर ‘कागर’ चित्रपटातही दमदार भूमिकेत अभिनेत्री रिंकू राजगुरू झळकली होती. पण सैराटसारखे यश तिच्या कागर चित्रपटाला मिळाले नव्हते. ती आता पुन्हा एकदा ‘मेकअप’ चित्रपटातून आपला अभिनय दाखवण्यास सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. या चित्रपटात रिंकू राजगुरूचा कोणता ‘मेकअप’ पाहायला मिळणार आहे, याची आतुरता प्रेक्षकांना आहे. १०० टक्के बिनधास्त, १०० टक्के चुलबुली आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल असलेल्या ‘पूर्वी’ची भूमिका रिंकू साकारताना दिसणार आहे. पण यासोबतच तिचा बिनधास्त आणि बोल्ड लूक नेमका कशासाठी आहे, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

रिंकूची दुहेरी लूक असलेली भूमिका ‘मेकअप’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसते. त्याचबरोबर काही ट्विट्स्ट आणि वळणांची झलकही ट्रेलरमध्ये दिसते. तिच्यासोबत अभिनेता चिन्मय उद्गीरकर भूमिका साकारत आहे. अलिकडेच सोशल मीडियावर त्याचाही लूक शेअर करण्यात आला होता. दोघांचा एकत्रितरित्या हा पहिलाच चित्रपट असल्याने त्यांची केमेस्ट्री पाहणे रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक गणेश पंडित यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनीय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ‘मेकअप’ चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment