शिवभोजन योजनेच्या अटी बघूनच भूक मरेल – निलेश राणे


मुंबई – आपल्या वचननाम्यात 10 रुपयात भोजन देण्याचे वचन राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने दिले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत पोटभर जेवण ही योजना सुरु करणार हे अपेक्षित होते. त्यानुसार, या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पण शिवभोजनाला अटी आणि शर्ती महाराष्ट्र सरकारने लावल्यामुळे यावरुन माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. नीलेश राणे यांनी शिवसेनेवर शिवभोजन योजनेच्या अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजनाचे नाव बदलून अटीभोजन असे करा, अशी घणाघाती टीका केली आहे.

राज्यातील गोर गरिबांना केवळ 10 रुपयांत जेवण मिळणार, असे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिले होते. त्यानुसार या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. परंतु, शिवभोजन या योजनेत महाराष्ट्र सरकारने अटींचा समावेश करुन सामान्य जनतेसमोर नवा प्रश्न निर्माण केला आहे. यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. माणसाची भूक शिवभोजन योजनेतील अटी बघूनच मरेल. शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा. सरळ हाताने काही मिळेल अशी अपेक्षा या सरकारकडून कुणी करू नये, असे संतापजनक विधान त्यांनी केले आहे.

Leave a Comment