राज्यमंत्री बच्चू कडूंचा दणका; दोन अधिकाऱ्यांना दिला नारळ


अमरावती – काल दर्यापूर येथील उपविभागीय कार्यालयाला भेट देऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेतली. पुरवठा विभागातील दोन अधिकाऱ्यांवर याच दरम्यान एका वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेत निलंबनाच्या कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची प्रमोद काळे आणि सपना भोवते, अशी नावे आहेत.

बच्चू कडू यांनी अकोट येथे जात असताना दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना तहसीलदार योगेश देशमुख आणि उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत पाचारण केले. यावेळी अधिकाऱ्यांनी सेवा हमी योजनेची योग्य अंमलबजावणी केली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिणामी त्यांनी अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली.

त्यांनी या भेटीदरम्यान राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सेवा हमी कायद्याची अंबलबजावणी न केल्यास माझा सामना करावा लागेल, अशी सक्त ताकीद दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे.

Leave a Comment