खातेवाटपाबाबत येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका


मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खातेवाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असल्याचे वक्तव्य केले. तसेच पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोण-कोणत्या नेत्याला देणार याचीही चर्चा या बैठकीत झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपाबाबत येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार, हा सर्वस्वी अधिकार असून त्याबाबत काल झालेली चर्चा ही सकारात्मक झाली असून, ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत कोणाला कोणते खाते मिळणार हे स्पष्ट होण्यास काही अडचण नसणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष समाधानी आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुटेपर्यंत ताणायचे नसते. त्यामुळे खातेवाटपाबात कोणतीही अडचण नसल्याचे पवार म्हणाले.

राज्यात तीन वेगवेगळ्या विचारसारणीच्या पक्षांचे सरकार आहे. खाते वाटपावरुन वाद असल्याची चर्चा करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्र्यांकडे खातेवाटपाचा सर्वस्वी अधिकार असून तीन पक्षांचे आणि मित्र पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे चर्चा करुनच निर्णय झाला आहे. आज संध्याकाळी खातेवाटप, पालकमंत्री नेमले जातील असा निर्णय काल बैठकीत झाल्याचे अजित पवार म्हणाले. कालच्या बैठकीमध्ये मंत्र्यांना ज्येष्ठतेनुसार दालन देण्याबाबतही चर्चा झाली, त्याचा अंतिम निर्णय झाला आहे. कार्यकर्त्यांना भेटण्या संदर्भात विस्तारित दालन देण्याबाबतही चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला कोणते पद मिळणार असा प्रश्न अजित पवार यांना केल्यानंतर पवार म्हणाले की, शरद पवारसाहेब आमच्या पक्षाचे सर्व निर्णय घेतील. कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे पवारसाहेब ठरवतील. त्याबाबत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचा अंतिम निर्णय आज होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Leave a Comment