पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या २८२ भारतीयांची होणार सुटका ?


नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या नागरिकांची यादी एकमेकांना सादर केली असून भारताने पाकिस्तानला आपल्या ताब्यात असलेल्या २६७ पाकिस्तानी नागरिक आणि ९९ मच्छिमारांची यादी सादर केली आहे. तर पाकिस्तानने भारताला त्यांच्या ताब्यात असलेल्या ५५ नागरिक आणि २२७ मच्छिमारांची सादर केली आहे.

२००८ च्या करारानुसार प्रत्येक वर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी आप-आपल्या ताब्यात असलेल्या नागरिक, मच्छिमारांची यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार भारताकडून कैद्यांची यादी जाहीर करण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय नागरिक, लष्करातील जवान आणि मच्छीमार जे त्यांच्या बोटीसह पाकिस्तानच्या कैदेत आहेत, त्यांना लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी जोर देण्यात आला आहे. पाकिस्तानने दिलेल्या यादीतील ४ नागरिक आणि १२६ मच्छिमार भारतीय असल्याची तत्काळ खात्री करून पाकिस्तानला माहिती दिली आहे. तसेच आपल्या १४ नागरिक आणि १०० मच्छिमारांचा पाकिस्तानने कायदेशीर प्रक्रियेसाठी मदत मिळवून देण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment