संजय राऊतांच्या बंधूंनी फेटाळले राजीनाम्याचे वृत्त


मुंबई – तब्बल महिन्याभरानंतर राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला असून ३६ नव्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राष्ट्रवादीच्या १४, शिवसेना आणि अपक्ष १२ तर काँग्रेसच्या १० जणांचा विस्तारात समावेश करण्यात आला आहे. पण अनेक नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलवण्यात आल्याने नाराजीचा सूरही उमटताना दिसला. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न देण्याचा निर्णय घेत धक्कातंत्राचा अवलंब केल्याने शिवसेनेत सारे अचंबित झाले. त्यातच शपथविधीला संजय राऊत गैरहजर राहिल्याने नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली. त्यातच आमदार सुनील राऊत राजीनामा देणार असल्याचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिले.

अखेर याबाबत खुद्द सुनील राऊत यांनी खुलासा केला असून पक्षावर आपण नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा मी आमदार असलो तरी त्याआधी मी एक कडवट शिवसैनिक असल्याचे सांगत सुनील राऊत यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आपण राजीनामा देत असल्याचे वृत्त निराधार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे सर्व चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार राज्यात आले यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट नसल्यामुळे मी नाराज असण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हणत सुनील राऊत यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Leave a Comment