राष्ट्रवादीचे नाराज आमदार राजीनामा देणार!


मुंबई – उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर जवळपास महिन्याभरानंतर महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ३६ मंत्र्यांनी यामध्ये सोमवारी राज्यपालांकडून मंत्रीपदाची शपथ घेतली. यात २५ कॅबिनेट मंत्री तर १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पण ज्यांना मंत्रीपदे मिळाली, ते खूश तर ज्यांना डावले गेले, ते नाराज असल्याचे चित्र प्रत्येक राज्यातील शपथविधीनंतर पाहायला मिळतो. यामध्ये जसे शिवसेनेतील काही ज्येष्ठ आमदार आहेत, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार देखील असल्यामुळे मंत्रीपद नाकारले गेलेले आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर त्यातील पहिले नाव आता समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

आमदार म्हणून प्रकाश सोळंके हे चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले आहेत. तसेच, ते माजी उपमुख्यंमत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहेत. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि आमदार असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपदाची अपेक्षा होती. पण, त्यांना मंत्रिपद नाकारून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आल्यामुळे सोळंके नाराज असल्याचे बोलले जात होते. अखेर, त्यांनी राजीनामा देत असल्याचे आज स्पष्ट केले आहे.

त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कर्तृत्व जास्त आहे. पक्षाला त्यांचे नेतृत्व मोठे वाटले असेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिल्यामुळे त्यांच्या मनातील नाराजी स्पष्टपणे जाणवत आहे. पण आपण नाराज असल्याची गोष्ट नाकारली आहे. मी पक्षावर नाराज नसून मला कंटाळा आल्यामुळेच मी राजीनामा देत आहे. त्यामुळे माझ्या नाराजीचा संबंध मंत्रीमंडळ विस्ताराशी जोडू नये. राजीनामा देऊन मी पक्षाचे काम करणार आहे. राजकीय सन्यास घेणार आहे. राजकारणाचा मला किळस आला असल्याचे ते म्हणाले आहेत. मात्र, नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Leave a Comment