पार्टीनंतरचा ‘हँँग ओव्हर’ असा करा दूर

hang
पार्टी ऑफिसच्या सहकाऱ्यांच्या सोबत असो, किंवा घरच्या मंडळींच्या सोबत, आताच्या काळामध्ये मद्यपान करणे ही सामान्य बाब झाली आहे. मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यामुळे होणारा ‘हँग ओव्हर’ हा मात्र त्रास देणारा ठरू शकतो. हा हँग ओव्हर त्रासदायक ठरू नये या करिता काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हँग ओव्हर दूर करण्यासाठी शरीरामध्ये पाण्याची मात्रा योग्य असणे, आणि योग्य आहार यांच्या मदतीने हँग ओव्हर फारसा त्रासदायक ठरत नाही.
hang1
मद्यपान केल्यानंतर शरीरामधील पाण्याची मात्र कमी होणे, म्हणजेच डीहायड्रेशन होणे, ही सामान्य बाब आहे. त्यामुळे या काळामध्ये पाण्याचे भरपूर सेवन आवश्यक असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चहा किंवा कॉफीचे सेवन न करता त्यापूर्वी गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याप्रमाणेच नारळाचे पाणी देखील शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची पातळी नियंत्रित ठेवण्यास सहायक असते. सकाळी उठल्यावर हँग ओव्हर असताना सर्प्रथम गरमागरम कॉफी पिण्याची इच्छा अनेकांना होते. मात्र कॉफीच्या सेवनामुळे शरीर आणखीनच डीहायड्रेट होते. त्यामुळे हँग ओव्हर असताना कॉफीचे सेवन टाळणे उत्तम. मात्र ग्रीन टीचे सेवन उपयुक्त ठरू शकते.
hang2
हँग ओव्हरमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. मद्यपानामुळे शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता हे या डोकेदुखी मागचे कारण असते. अश्या वेळी मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत असणारी केळी, डोकेदुखी कमी करण्यास सहायक ठरू शकतात. केळ्यांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियमही मुबलक प्रमाणामध्ये असते. त्याचप्रमाणे अॅसिडीटी कमी करण्यासही केळी सहायक असतात. त्यामुळे हँग ओव्हरमुळे होणारी डोकेदुखी, मळमळणे, पोटातील जळजळ या तक्रारी दूर होतात.
hang3
डोकेदुखी किंवा अॅसिडीटी होत असल्याने हँग ओव्हर असताना काहीही न खाल्लेलेच बरे अशी अनेक लोकांची समजूत असते. पण ही समजूत चुकीची आहे. जास्त प्रमाणात प्रथिने आणि कर्बोदके असणारा नाश्ता अश्या वेळी सहायक ठरत असतो. हँग ओव्हर असल्यास सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी खाणे हा चांगला पर्याय आहे. यामध्ये असणारे ‘सायस्टीन’ नामक तत्व शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करणारे आहे. हँग ओव्हर दूर करण्याकरिता आणखी मद्यपान केल्याने हँगओव्हर लवकर दूर होतो हा आणखी एक गैरसमज आहे. असे केल्याने हँग ओव्हर आणखीनच वाढेल. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्र योग्य असेल अशी पेये आणि पोषक आहार यांच्याच मदतीने हँग ओव्हर लवकर दूर होतो.

Leave a Comment