मंत्रिमंडळ विस्तारातून भावाचे नाव वगळल्यामुळे संजय राऊत नाराज?


मुंबई – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असून मंत्रिपदाची तिन्ही पक्षातील नेते आणि आमदार शपथ घेणार असून, मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक इच्छुकांचा पत्ताही कापण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या भावाचेही यात नाव नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर राऊत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

मुख्यमंत्रीपदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा एका महिन्यानंतर विस्तार होत आहे. सहा मंत्रीच गेल्या महिनाभरापासून राज्याचा कारभार हाकत होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार असा सवाल केला जात होता. अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अनेकांच्या मंत्री होण्याचा ईच्छा अपुरीच राहिली आहे.

मंत्रीपदाच्या शर्यतीत तिन्ही पक्षातील अनेक नेते आणि आमदारांची नावे होती. पण, त्यांच्या नावांना ऐनवेळी कात्रीत लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भावाचेही नाव आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी मंत्रिमंडळात आमदार सुनील राऊत यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. त्यांचे संभाव्य यादीतही नाव असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. पण, ऐनवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

Leave a Comment