जिओ फायबर युजर्सना मिळणार 199 रुपयांत तब्बल 1000GB डेटा


नवी दिल्ली – रिलायन्स जिओ फायबर युजर्सना आता कंपनीकडून 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरवर तब्बल 1000GB डेटा दिला जात असून या प्लॅनमध्ये आतापर्यंत केवळ 100GB डेटा मिळत होता. त्याचबरोबर या प्लॅनच्या वैधतेमध्ये कोणताही बदल केलेला नसून अद्यापही सात दिवस इतकीच वैधता आहे.

प्लॅनमध्ये झालेल्या या बदलाचा फायदा जिओ फायबरचे जे ग्राहक 699 रुपये आणि 849 रुपयांच्या बेसिक प्लॅन्सचा वापर करतात त्यांना होणार आहे, कारण FUP मर्यादा या दोन्ही प्लॅनमध्ये आहे. तर, तब्बल एक टीबी डेटा असल्यामुळे 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा संपण्याची अधिक चिंता राहणार नाही. जिओ फायबरला लाँचिंगवेळी प्लॅन्स महागडे असल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून प्लॅन्स आणि टॉप-अप व्हाउचर्समध्ये बदल केले जात आहेत.

एअरटेलच्या ब्रॉडबँड प्लॅन्ससोबत मार्केटमध्ये जिओ फायबरची टक्कर आहे. हैदराबाद सर्कलमध्ये एअरटेलकडून युजर्सना 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. तर, 699 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये जिओ फायबर युजर्सना एका महिन्यासाठी केवळ 150जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर एअरटेलच्या 299 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये दर महिन्याला 3.3टीबी डेटा मिळत आहे. एअरटेलचे प्लॅन जिओ फायबरच्या तुलनेने अधिक फायदेशीर असल्यामुळेच जिओ फायबरला 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरमध्ये 100जीबी डेटा वाढवून तब्बल 1टीबी करावा लागल्याची चर्चा आहे.

Leave a Comment