जगामध्ये सर्वाधिक अपत्यांना जन्म देणारी महिला – व्हॅलेन्तिना व्हॅसिल्येव

baby
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगामध्ये सर्वाधिक अपत्यांना जन्म देण्याचा विक्रम अठराव्या शतकातील एका रशियन महिलेच्या नावाने नोंदलेला आहे. हा विक्रम आजतागायत तिच्याच नावे कायम असून, तिच्या इतकी अपत्ये आजवर कोणीही जन्माला घातलेली नाहीत. या महिलेचे नाव नेमके काय आहे याचा स्पष्ट उल्लेख जरी कुठे सापडत नसला, तरी फियोडोर व्हॅसिल्येव नामक एका शेतकऱ्याची ही पत्नी असून तिचे नाव व्हॅलेन्तिना असावे असे काही जणांचे म्हणणे आहे.
baby1
व्हॅलेन्तिनाची तब्बल २७ बाळंतपणे झाली. यामध्ये सोळा वेळा तिला जुळी मुले झाली, सात वेळा तिळी मुले झाली आणि चार वेळा चार-चार मुले झाली. या एकूण ६९ मुलांपैकी ६७ मुले त्या काळामध्ये कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही व्यवस्थित जगली हे खरेच मोठे आश्चर्य आहे. आता प्रश्न पडतो तो असा, की व्हॅलेन्तिनाला खरोखर इतकी मुले झाली असतील का? या सगळ्यामध्ये रोचक गोष्ट अशी, की इतकी मुले झाल्यानंतर व्हॅलेन्तिनाचा पती फियोडोर तिच्यापासून विभक्त झाला आणि त्याने दुसरा विवाह केला. या विवाहसंबंधांतूनही त्याला एकोणीस मुले झाली ! ही सर्व माहिती रशियातील ‘मोनॅस्ट्री ऑफ निकोल्स्क’ मध्ये असलेल्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध असून, त्याकाळी रशियाच्या त्या रहिवासी भागातील नव्याने जन्मलेल्या अपत्यांची नोंद या मोनॅस्ट्री मध्ये होत असे. मोनॅस्ट्रीमध्ये असलेल्या नोंदींवरून १७८२ साली अस्तित्वात असलेल्या फियोडोर व्हॅसिल्येव यांना एकूण ८७ अपत्ये होती ! १७८२ साली फियोदीर यांचे वय पंच्याहत्तर वर्षांचे होते. आणि त्यावेळी त्यांची ८२ अपत्ये हयात होती.
baby2
आजच्या काळामध्येच काय, तर एकोणिसाव्या शतकामध्येदेखील लोकांचा या गोष्टीवर सहजासहजी विश्वास बसला नव्हता. ‘द फ्रेंच अकॅडमी’च्या वतीने या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी सेंट पीटर्सबर्गमधील इम्पिरियल अकॅडमीकडे विचारणा केली असता, रशियाच्या वतीने कोणतेही उत्तर अथवा प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला. ‘इतर कोणत्याही देशातील संस्थांना या विषयी माहिती देणे आपल्याला गरजेच वाटत नसून, जरी व्हॅसिल्येव कुटुंबामध्ये इतकी अपत्ये असली, तरी त्यांची देखभाल करण्यास रशियन सरकार समर्थ असल्याचे’ रोखठोक उत्तर रशियातर्फे द फ्रेंच अकॅडमीला दिले गेले होते.
baby3
व्हॅलेन्तिना व्हॅसिल्येव हिने ६९ अपत्यांना जन्म दिला आणि त्यातील ६७ अपत्ये जगली ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी असली, तरी याहूनही मोठे आश्चर्य खुद्द व्हॅलेन्तिनाने देखील एवढी बाळंतपणे सुखरूपपणे निभावली, हे आहे. १७२५ ते १७६५ या काळामध्ये व्हॅलेन्तिनाने आपल्या अपत्यांना जन्म दिला असे लक्षात घेतले, तर याचा अर्थ चाळीस वर्षांच्या प्रजोत्पादनाच्या काळामध्ये सुमारे अठरा वर्षे व्हॅलेन्तिना गर्भवती होती असा आहे !

Leave a Comment