‘मेनोपॉझ‘ची सामान्य लक्षणे


साधारण चाळीस ते पंचेचाळीस या वयामध्ये प्रत्येक स्त्रीला मेनोपॉझमुळे उद्भविणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. या वयामध्ये स्त्रियांची प्रजनन क्षमता संपुष्टात येऊन त्यांचा मासिक धर्मही थांबतो. ही प्रक्रिया संपूर्णपणे नैसर्गिक असली, तरी प्रत्येक स्त्रीचा याबाबतचा अनुभव वेगळा असू शकतो. या प्रक्रियेचा परिणाम स्त्रियांच्या शरीराबरोबरच त्यांच्या मनस्थितीवरही होताना पाहायला मिळतो. मेनोपॉझ प्रत्यक्ष होण्यापूर्वी, त्याची लक्षणे थोडा काळ आधीपासूनच दिसावयास सुरुवात होते. ही लक्षणे सर्वसामान्यपणे बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत दिसून येतात.

मेनोपॉझच्या काळामध्ये स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोन्समधे बदल घडून येत असतात. परिणामस्वरूप या काळामध्ये स्त्री अधिक भावूक बनते. अगदी अनपेक्षितपणे स्त्रीची मनस्थिती अचानक बदलते. क्षणांत हसू आणि दुसऱ्याच क्षणी आसू, अशी काहीशी अवस्था या काळामध्ये होते. या काळामध्ये शरीराचे मेटाबोलिझम अगदी शिथिल झालेले असते, त्यामुळे या काळामध्ये वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. क्वचित एखाद्या स्त्रीच्या बाबतीत निद्रानाशासारखे विकार उद्भविण्याची शक्यता असते. तशी तक्रार जाणविल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नयेत.

मेनोपॉझच्या काळामध्ये काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर थोड्याफार प्रमाणात केसांची वाढ दिसून येते. ही वाढ जर प्रमाणाबाहेर जास्त असेल तर वैद्यकीय सल्ल्यानुसार हॉर्मोनल असंतुलानाकरिता उपचार करावे लागतात. या काळामध्ये स्त्रियांची मानसिक अवस्था मोठी विचित्र असते. या काळामध्ये स्वभाव काहीसा चिडचिडा बनतो. अगदी लहान सहान गोष्टी सुद्धा मानासिक तणावाला कारणीभूत ठरू लागतात.

मेनोपॉझच्या काळामध्ये शारीरिक थकवा सातत्याने जाणवत राहतो. तसेच पायांवर सूजही दिसून येऊ लागते. पायावरची सूज नियंत्रणात ठेवण्याकरिता रात्रीच्या वेळी पाणी कमी प्यावे. मेनोपॉझची ही सर्व लक्षणे एकाच वेळी दिसून येतील असे नाही. तसेच प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत सर्व लक्षणे सारख्या प्रमाणत दिसून येतील असेही नाही. पण काही लक्षणे प्रमाणाबाहेर जाणवू लागल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment