नोकरीसाठी निवडीची नवी पद्धत


अनेक कंपन्या विविध महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांतून आपल्याला हव्या असलेल्या कर्मचार्‍यांची निवड करतात आणि त्यासाठी मुलाखती घेतात. काही कंपन्यांना आता मुलाखत हा प्रकार पुरेसा वाटेनासा झाला आहे. त्यामुळे त्यांनी मुलाखतीसोबत गटचर्चाही आयोजित करायला सुरूवात केली असून या चर्चेतूनही मुलांच्या काही गुणांची परीक्षा करायला प्रारंभ केला आहे. त्यामुळे जीडी अँड पीआय हा शब्द कँपस इंटरव्ह्यूमध्ये सामान्य झाला आहे. असे असले तरीही आता काही कंपन्या निराळ्या पद्धतीने उमेदवारांची निवड करायला लागल्या आहेत. नुकतेच एका कंपनीने उमेदवारांच्या निवडीसाठी फुटबॉलचे सामने आयोजित केले. या सामन्यांत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते पण या खेळातून ही कंपनी आपली निवड कशी काय करणार आहे हे अनेकांना माहीत नव्हते.

कंपनीने मात्र या सामन्यांत सहभागी झालेल्या ६० संघांच्या आणि त्यांच्या खेळाडूंच्या कौशल्याचे फार वेगळ्या रितीने निरीक्षण केले. यातले जे संघ विजयी झाले किंवा उपविजेते ठरले त्यांनाच केवळ नोकर्‍या मिळाल्या असे झाले नाही. काही मुलांचे संघ त्यापूर्वीच्याच राउंडला पराभूत झाले होते म्हणजे शेवटच्या आठ संघात होते. मात्र त्यांचे संघ पराभूत झाले म्हणून या मुलांना अपयशी मानले गेले नाही. या स्पर्धेतून उप उपांत्य सामन्यात पराभूत झालेल्या काही खेळाडूंना कँपस इंटरव्ह्यूच्या पहिल्या पायर्‍या माफ करून ेशेवटच्या राउंडला प्रवेश देण्यात आला. या सामन्यातून अशी निवड झालेल्या एका खेळाडूला तर या कंपनीत चांगल्या पॅकेजसह नोकरीही मिळाली.

कंपनीच्या मनुष्यबळ विकास खात्याचे याबाबत म्हणणे असे आहे की उमेदवाराला नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या गुणांची गरज असते त्यातले काही गुण केवळ मुलाखतीतूनच दिसून येतील असे काही नाही. नेतत्वगुण, निर्णय क्षमता, टीम बांधण्याचे कौशल्य, शिस्त, तणावाच्या स्थितीतही काम करण्याची क्षमता, असे काही गुण त्या मुलाच्या अंगात आहेत की नाहीत हे खेळाच्या मैदानावरही समजू शकते. म्हणून या सामन्यांत सहभागी झालेल्या खेळाडूंचे खेळताना सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले. अशाच रितीने आता काही कंपन्या उमेदवारांच्या निवडीसाठी निरनिराळ्या कल्पना राबवीत आहेत. एका कंपनीने आपल्याला हव्या असलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी त्यांना ग्राफिक डिझाईनच्या स्पर्धेत उतरवले. त्यातून त्यांच्यात नव्या कल्पना लढवण्याचे कसब आहे की नाही हे पाहिले गेले.

Leave a Comment