सरत्या वर्षामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी


आपल्यापैकी सर्वांनाच डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सरत्या वर्षांला निरोप देण्याचे आणि आगामी वर्षांच्या स्वागताचे वेध लागतात. नव्या गोष्टींचा आरंभ करतानाही काही जुन्या घडामोडी कायम लक्षात राहतात. वर्षाअखेर आवर्जून त्याचा आढावा घेतला जातो. असंख्य घडामोडी गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. त्यामध्ये पुलवामाचा बदला घेणारा एरियल स्ट्राईक, ट्रिपल तलाक आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द अशा महत्वाच्या घटनांचा समावेश आहे. त्याच काही घडामोडींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चल तर जाणून घेऊया त्या घडामोडींबद्दल…

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल – सर्वोच्च न्यायालयात मागील दशकांपासून सुरू असलेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर या वर्षाच्या 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा निकाल दिला. संपूर्ण देशांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे.

ट्रिपल तलाक रद्द – अखेर राज्यसभेत ट्रिपल तलाकबंदी विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ९९ विरुद्ध ८४ मतांनी ३१ जुलैला संमत करून ऐतिहासिक विजय मिळवला. हा कायदा मोडणाऱ्या पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. ट्रिपल तलाक बंदी कायद्यानुसार पतीला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद, त्याचबरोबर आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

पुलवामाचा बदला घेणारा एरियल स्ट्राईक – 14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. भारताने यानंतर पुलवामाचा बदला म्हणून 26 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालकोट एरियल स्ट्राईक करत दहशतवाद्याची तळे उद्धवस्त केल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानला प्रतिउत्तर देताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. दोन दिवस अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकारने याप्रकरणी कठोर भूमिका घेतल्यामुळे एक मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. हा भारताच्या मुत्सद्दी धोरणांचा विजय मानण्यात आला.

करतारपूर कॉरिडॉर प्रकल्प मार्गी – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्तारपूर कॉरिडॉर प्रकल्प या वर्षी मार्गी लागला. भारतातील बेर साहीब या गुरुद्वाराला पाकिस्तानात असलेले शीखांचे पवित्र स्थळ गुरुनानक साहिब कॉरिडॉरने जोडण्यात आले आहे. ९ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरदासपूर येथे भारताकडील बाजूचे उद्घाटन केले. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जन्मदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्यात आला.

देशात प्रलयंकारी पाऊस आणि पूरस्थिती – कर्नाटक, केरळ, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम आणि महाराष्ट्रात प्रलयंकारी पावसाने थैमान घातले. त्यात अनेकांनी आपला जीव गमावला. तर अनेकांना आस्मानी संकटांचा सामना करावा लागला. या आपत्तीमध्ये हजारो घरे पडली; शेकडो जनावरांचा व मानवांचा बळी गेला. जीवितासोबतच प्रचंड वित्तहानी झाली. या पुराचा जागतिक वारसा स्थळ हम्पीलाही फटका बसला आहे.

हैदराबादमधील बलात्काराची अमानुष घटना- हैदराबादमध्ये बलात्कार करून पशुवैद्य तरुणीची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर बलात्कार करून महिलांना जिवंत जाळल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. त्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली.

देशाला मिळाले पहिले राफेल विमान – भारताला विजयादशमी आणि एअरफोर्स दिनी पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: फ्रान्सला जाऊन शस्त्रपूजन करत विमान आपल्या ताब्यात घेतले. राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती. राफेलचा मुद्दा देशभर गाजला होता.

देशभरातील निवडणुकांचे रंग – भाजपने 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर सर्वाधिक जागा मिळालेल्या मित्रपक्ष भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी-काँग्रेससह वेगळी चूल मांडली आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) झारखंडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची धूळ चारली. तर भाजपने हरियाणामध्ये सत्ता स्थापन केली. कर्नाटकातही १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले. यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी – राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अंतिम यादी आसाममध्ये जाहीर झाली. ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा यामध्ये समावेश करण्यात आला. तर, यातून १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना वगळण्यात आले.याविरोधात आसाममध्ये जोरदार निदर्शनं झाली. यानंतर सरकारने या लोकांना नागरिकत्व सिद्ध करण्याची संधी मिळावी म्हणून यादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले. यातून वगळले गेल्यास आंतरराष्ट्रीय लवादासमोर स्वतःची बाजू मांडता येणार आहे. त्यानंतर सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन सुरू आहेत.

कलम 370 आणि कलम ३५ ए रद्द – ५ ऑगस्टला मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 आणि कलम ३५ ए रद्द केले. यासोबतच भारतीय संसदेने जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर करत जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला.

Leave a Comment