पीक कर्जमाफीच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा – राजू शेट्टी


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेला पीक कर्जमाफीचा निर्णय हा घाईगडबडीतला असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते ते त्यांनी पूर्ण केला नसल्याचा आरोपही शेट्टींनी केला आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांवर काढलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडणे शक्य नाही. सध्याच्या कर्जमाफीच्या आदेशानुसार, हा शेतकरी थकबाकीदार ठरत नाही तसेच तो हे कर्ज बँकांना परतही करु शकत नाही कारण त्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार, जो शेतकरी मागील वर्षी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढले ते पात्र ठरत नसल्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे.

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके गेली ते शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरणार नाहीत. कारण जून २०२० साली त्यांच्या कर्जाची मुदत संपणार असल्यामुळे थकबाकीत हे कर्ज जाणार नाही. त्यामुळे हा शेतकरी नव्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे सरकार सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करु शकलेले नाही. शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या कर्जांची पूर्ण माहिती न घेता घाईगडबडीत निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे सरकारने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

Leave a Comment