मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता यांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान?


पुणे – अमृता फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय योगदान दिले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उपस्थित करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘ठाकरे’ आडनावावरुन टीका केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. या टीकेचा शिवसेनेने निषेध केला असून अमृता फडणवीस यांच्याविरोधात काही शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलनही केले. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे.


अमृता फडणवीस यांच्यावर रूपाली चाकणकर यांनी ट्विटवरुन टीकास्र सोडले आहे. आडनावावरुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांच्या आडनाव बद्दल बोलण्याचा अधिकार उरले नसल्याचा टोला चाकणकर यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री पत्नी म्हणून, आपण गेल्या पाच वर्षांत, महाराष्ट्रातील जनतेसाठी काय योगदान दिले, याचे थोडेतरी आत्मपरीक्षण करा आणि तसेही आपल्याला आणि आपल्या अहंकारी विचारांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आडनावाबद्दल बोलण्याचा अधिकार आपल्याला उरला नसल्याचे चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


चाकणकर यांनी दुसऱ्या ट्विटमधून अमृता यांना एक सल्ला दिला आहे. अमृता यांनी पराभवामुळे निराश झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांना मानसिक आधार द्यावा असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे. अमृताताई, खर तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतुन आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांना देखील मानसिक आधार द्यायला हवा होता, पण साराच अंधार दिसत आहे आपल्या विचारात, असे चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

Leave a Comment