आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू होणार नाही ; जगनमोहन रेड्डी


अमरावती – आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू होणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. रेड्डी काडपा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुस्लीम समाजाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान, एनआरसीबाबत मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. त्याला उत्तर म्हणून आम्ही नागरिकत्व नोंदणीचा विरोध करत असून त्याचा राज्यातील अल्पसंख्यांकांवर काहीही परिणाम होणार नाही, याची खात्री मी देत असल्याचे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, की याआधीच एनआरसीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अमजथ बाशा यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याला आमचा नक्कीच विरोध असल्यामुळे आंध्र प्रदेशात एनआरसी लागू होणार नसल्याचा विश्वास मी सर्व मुस्लिम बांधवांना देतो. त्याआधी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जगनमोहन यांना, कॅब आणि एनआरसीबाबत केंद्रसरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. मी माझे मित्र जगनमोहन रेड्डी यांना अशी विनंती करतो, की केंद्राला असलेल्या आपल्या पाठिंब्याबाबत त्यांनी पुनर्विचार करावा. आपल्याला देश वाचवायचा असल्याचे वक्तव्य ओवैसी यांनी हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये केले होते.

Leave a Comment