25 आणि 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत दारू विक्रीला परवानगी


मुंबई – जवळपास महिनाभर आधीपासूनच 31 डिसेंबरच्या पार्टीचे सर्वांचे प्लॅनिंग सुरु होते, त्यात तळीरामांचा उत्साह हा विशेष उल्लेखनीय असतो. महाराष्ट्र सरकारतर्फे या मंडळींना हाच उत्साह लक्षात घेऊन एक न्यू इयर गिफ्ट देण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाताळच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 डिसेंबर रोजी तसेच नाताळ म्हणजे 25 डिसेंबरला व नवीन वर्षाच्या रात्री म्हणजेच 31 डिसेंबरला राज्यातील मद्य विक्री दुकानांना पहाटे 5 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण असे असले तरी यादिवशी खरेदी करताना ग्राहकांनी सर्तक रहावे असे आवाहनही सरकारने केले आहे, या दिवसांची मागणी पाहता अनेक परवाना विना चालणाऱ्या दुकानात नकली आणि भेसळयुक्त माल विकला जातो, त्यामुळे केवळ अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी अशी सूचना करण्यात आली आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत दुकाने अनेकदा बंद झाली तरी विना परवाना चालणाऱ्या दुकानातून अनेक ग्राहक दारू खरेदी करतात, या मालाचा दर्जा विश्वसनीय नसतो. त्यामुळे शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतो, हे होऊ नये तसेच आर्थिकी दृष्ट्या दारू विक्रेत्यांना फायद्याचे ठरावे याकरिता या खास दिवशी दारू विक्रीला पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे.

दरम्यान, सध्या वास्तविक दररोज दारू विक्री करणारी दुकाने रात्री 11 ते 12 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी आहे, तर परमिट रूम 1.30 वाजेपर्यंत सुरु ठेवले जातात, पण ही सवलत नवीन वर्षाच्या पार्टीच्या दिवशी देण्यात आली आहे. याशिवाय दारू विक्री मान्य असली तरी मद्यपान करण्याच्या नियमात कुठेही सवलत दिलेली नाही, नियमानुसार मद्यपींनी परमिट रूममध्ये किंवा घरातच मद्यपान करावे, सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार केल्यास 5,000 पर्यंतचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

Leave a Comment