आता तंबाखूमुक्त केली जाणार सरकारी कार्यालये


पुणे: आपल्यापैकी अनेकजणांनी सरकारी कार्यालयाची वारी केलीच असेल यात काही शंका नाही. त्यातच सरकारी कार्यालयांच्या भिंतीचा नजारा काही औरच असतो. सरकारी कार्यालयाच्या भिंती या थुकरटांनी रंगवलेल्या आपल्या सहज निदर्शनास येतील. त्याचबरोबर डबी काढून चुना लावून तंबाखू मळत बसलेल्या व्यक्ती देखील आपल्या निदर्शनास येतील. पण यापुढे आता हे आता सरकारी कार्यालयांमधील हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. कारण आता सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त केली जाणार आहेत. आता सरकारी पातळीवरच सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पथके नेमण्यात येणार असून, यापुढे तंबाखू-चुना चोळत सरकारी कार्यालयांमध्ये पिचकाऱ्या मारण्यास बंदी असणार आहे.

नुकतीच जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. सर्व सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. बी. नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तंबाखू नियंत्रण कायदा आणि महत्त्वाची कलमे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कशी करायची; तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकांकडून करण्यात येणारी कार्यवाही याबाबत ऊहापोह करण्यात आला. याबाबत माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक नांदापूरकर यांनी सांगितले की, तंबाखूमुक्त सर्व शासकीय कार्यालये करण्यात येणार आहेत. त्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत बैठकीत चर्चा झाली.

Leave a Comment