बुमराहला एनसीएमध्येच द्यावी लागेल फिटनेस टेस्ट – सौरव गांगुली


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेस टेस्टबद्दल चर्चा सुरु होत्या. बुमराहची फिटनेस टेस्ट करण्याबद्दल बंगळुरुची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी उत्सुक नसल्याची माहिती समोर आली होती. तसेच एनसीएमध्ये जाण्याऐवजी स्वतःचे खासगी डॉक्टर आणि ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे बुमराहनेही पसंत केले होते. पण या सर्व प्रकरणावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपले मत मांडत, एनसीएमध्येच बुमराहला फिटनेस टेस्ट द्यावीच लागेल असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची नेमकी माहिती माझ्याकडे नाही. पण एनसीएमध्ये भारतीय खेळाडूंना परतावच लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर एनसीएमधून खेळाडूंनी फिटनेस टेस्ट देणे हा पहिला आणि शेवटचा पर्याय आहे. योग्य त्या सुविधा त्यांना उपलब्ध करुन देणे ही आमची जबाबदारी असल्याची माहिती सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. एनसीएमध्ये जाण्यास बुमराहने नकार दिल्यानंतर याबद्दल संचालक राहुल द्रविडनेही नाराजी व्यक्त करत बुमराहला स्वतःच्या डॉक्टर आणि ट्रेनरसोबत सरावाचा सल्ला दिला होता. आपण राहुल द्रविडशी यासंदर्भातही चर्चा करणार असल्याचे गांगुलीने स्पष्ट केले.

Leave a Comment