अयोध्या राममंदिरात दलित पुजारी नेमला जाण्याची शक्यता


अयोध्येत राम जन्मभूमीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात पहिला पुजारी दलित असू शकतो असे संकेत दिले गेले आहेत. रामजन्मभूमी वाद संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असताना आणि येत्या चार महिन्यात भव्य राम मंदिर उभारले जाईल असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्यावर मंदिराचा पहिला पुजारी होण्याचा मान कुणाला मिळणार याची चर्चा सुरु झाली असून राम मंदिर न्यास या प्रस्तावित ट्रस्ट मधील एका व्यक्तीकडून ही माहिती दिली आहे.

यासाठी संत रामानंद परंपरेचा हवाला दिला गेला आहे. या परंपरेत संत कबीर, संत रविदास याचा समावेश होतो. राम जन्मभूमी मंदिरासाठी एक प्रस्थावित ट्रस्ट नेमला जात असून त्यासंदर्भात सरकार विचार विमर्श करत आहे. दलील समाजातील पण योग्य गुणवत्ता असलेला पुजारी नेमला जावा असा विचार सुरु असून हे पुजारीपण वंशपरंपरेने दिले जाणार नाही. संत रविदास दलित होते त्यामुळे दलित पुजारी नेमण्यात कोणतीच अडचण नाही असेही सांगितले जात आहे.

प्रस्तावित ट्रस्ट संदर्भात स्पष्ट माहिती मिळू शकलेली नसली तरी यात ११ सदस्य असतील आणि त्यात सरकारी प्रतिनिधी म्हणून अयोध्येचे जिल्हाधिकारी किंवा फैजाबाद आयुक्त याच्यासह १ केंद्रीय अधिकारी असू शकेल असा अंदाज आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भाजपचा कोणीही नेता ट्रस्ट मध्ये असणार नाही असे पूर्वीच जाहीर केले आहे तर विश्व हिंदू परिषदेने त्यांचा कोणताही पदाधिकारी ट्रस्टचा थेट सदस्य नसेल असे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment