व्हायरल; ठाणेकरांनों बघा येथे धुतले जातात तुमचे चहाचे ग्लास


मुंबई – कुर्ला रेल्वे स्थानकातील सात व आठ नंबर फलाटावरील खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. हा प्रकार मोबाइलद्वारे चित्रित करून एका जागरूक प्रवाशाने सोशल माडियाच्या माध्यमातून शेअर केल्यानंतर काही तासांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मुंबईकरांचा सोशल मीडियावरून संताप व्यक्त होऊ लागला होता. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेत त्या स्टॉलवर त्वरित कारवाई करत टाळे ठोकले होते. यानंतर आता ठाणे रेल्वे स्थानकावरील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


ठाणे रेल्वे स्थानकावरील एका स्टॉलमधील व्यक्ती त्या ठिकाणी सुक्या कचऱ्यासाठी ठेवलेल्या कचरापेटीत चहाचे कप धुताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विटरवर मंदार अभ्यंकर नावाच्या एका जागरूक प्रवाशाने शेअर केला आहे. ती व्यक्ती चहाचे ग्लास धुत असलेल्या डब्यातच आपली बनियानही धुत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनादेखील अभ्यंकर यांनी हा व्हिडीओ टॅग केल्यानंतर या व्हिडीओची दखल घेतल्याचे ट्विट रेल्वे प्रशासनानेही केले आहे. यावर आता रेल्वे प्रशासन काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.

Leave a Comment