मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ शेअर भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर


नवी दिल्ली – देशाच्या विविध भागात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात (CAA) जोरदार आंदोलने सुरु आहेत. आज डाव्या पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनीही याला पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी २००३ मध्ये राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. बांगलादेशात धार्मिक कारणावरुन हिंसाचाराला बळी पडलेल्या शरणार्थींसाठी सरकारने सहानुभूतीपूर्ण भुमिका घ्यावी असा सल्ला यामध्ये सिंग देत आहेत.


अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सन २००३ मध्ये सरकार सत्तेत होते. मनमोहन सिंग त्यावेळी राज्यसभेत विरोधीपक्ष नेते होते. मनमोहन सिंग सभागृहात उपस्थित तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना उद्देशून बोलताना म्हणतात, शरणार्थींवर ओढवलेले संकट मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. आपला शेजारील देश बांगलादेशात फाळणीनंतर धार्मिक आधारावरुन नागरिकांवर अन्याय झाला. जर आपल्या देशात हे पीडित लोक शरणार्थी म्हणून आले तर त्यांना शरण देणे आपले नैतिक कर्तव्य आहे. या लोकांना शरण देण्यासाठी आपला उदार व्यवहार असायला हवा. त्यामुळे मी नागरिकत्व संशोधन विधेयकाकडे गांभीर्यपूर्वक उपपंतप्रधानांचे लक्ष वेधू इच्छितो.

काँग्रेसचा धार्मिक आधारावर शरणार्थींना नागरिकता देण्याविरोधात विरोध कायम आहे. त्याचबरोबर नागरिकत्व कायद्याला इतर विरोधी पक्ष देखील विरोध करीत आहेत. अशा वेळेस भाजपने माजी पंतप्रधानांचा याबाबतचा पूर्वीच्या भाषणाचा व्हिडिओ समोर आणला आहे. याद्वारे भाजपने देखील आता काँग्रेसवर पलटवार करण्यासाठी नवे हत्यार उपसले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ भाजपने पिन करुन ठेवला आहे.

Leave a Comment